Thursday, January 5, 2017

करुणात्रिपदी




करुणात्रिपदी - ॥१॥

शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥

अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा घरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥

तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥

तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥

करुणात्रिपदी - ॥२॥
श्री गुरुदत्ता जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
चोरे द्विजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥
पोटशुळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥
द्विजसुत मरतां वळले ते मन हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां वळले ते मन न वळे की आतां । श्री गुरुदत्ता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥
जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।


करुणात्रिपदी - ॥३॥
जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।
निज अपराधे उफराटी दृष्टि होऊनि पोटी भय धरु पावन । जय करुणाघन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन । जय करुणाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन । जय करुणाघन ॥३॥
बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन । जय करुणाघन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन । जय करुणघन ॥५॥
निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।









करुणा त्रिपदीचे महत्व

श्री गुरुमुर्ती चरित्रात करुणात्रिपदीचे महत्व काय आहे ह्याचे सर्व भाविकांना अतिशय उदबोधक असे वर्णन दिसुन येते. मंत्ररुप प्रसादीक व दत्तभक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्‍या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्रग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३,अध्याय ९२ ह्यात करुणात्रिपदीचे महत्व विशद केले आहे.
त्यातील महत्वाच्या ओळी अशा:-

आपत्ति येता श्रद्धापुर्वक| या त्रिपदीचे पाठ देख|
एकविंशतिवर नि:शक| नित्य करिता एकनिष्ठेनें||५०||
आपत्तिचे होते निरसन| तॅसेंच व्याधिग्रस्तासि जाण|
एकविशतीवर नित्य श्रवण| दत्तत्रिपदी एकवितां||५१||
व्याधी पासुनियां तो रोगी| मुक्त होईल जाणिजे वेगीं|
परि श्रध्दा पाहिजे अंगीं| श्रध्देसमान फल लाभे||५२||
करुणात्रिपदींचे हे फल| निवेदिलें भक्त हो सकळ|
यास्तव त्रिपदें सर्वकाळ| दत्त दयाळ स्तवावा||५३||

श्री गुरुमुर्ती चरित्र||अध्याय- ९२||

ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा :-
काही आपत्ति येता जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणतीही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्तिचे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत: करणाने जो ह्या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल.
भक्तांसाठी करुणात्रिपदीचे हे तत्कलिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सदगुरुक्रुपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरुंचे स्तवन करावे. म्हणजेच त्रिपदी नियमितपणे म्हणत जा ही कृपावंत सदगुरुंचीच आज्ञा आहे व नानामहाराजांचेही आग्रहपुर्वक हेच सांगणे आहे. म्हणुन आपण त्यांच्या आज्ञाचे पालन करुया व सदगुरुंना प्रिय होण्याचे प्रयत्न करुया.
राष्ट्रसंत प.पु. श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या श्री क्षेत्र नर्सी नामदेव .जि, हिंगोली येथे शके १८२७ ,इ. १९०५ मध्ये प.पुज्य श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांचा १५ वा चातुर्मास संपन्न झाला .याच वेळी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली व हा अघटीत प्रकार पाहून वाडीची मंडळी घाबरून गेली .आता वाडीवर मोठे संकट येणार असे सर्वांना वाटले .या संकटाच्या नीरसनार्थ ही मंडळी प.पु. सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामींना भेटण्यासाठी नर्सी येथे मुक्कामी आली.नरसोबावाडी येथे श्री दत्त सेवेत काही चुका झाल्यामुळेच हा प्रकार झाल्याचे स्वामींना समजले .तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपा संपादनासाठी श्री क्षेत्र नर्सी येथे स्वामींकडून सुप्रसिद्ध सिद्ध मंत्र करूणा त्रिपदी काव्याची रचना झाली , तीच्या नित्य पाठातून सर्व विघ्ने होतील असा आआशिर्वाद मिळाला पुढे ही करूणा त्रिपदी सर्व दत्तोपासनेत प्रचलित समाविष्ट झाली .मित्रहो आपण कुठेही असा प्रवासात घरी दारी न चुकता आपल्या पठनात ठेवा .आर्तभावनेने त्रिपदी पठन करा मग बघा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील तर मित्रहो दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांन पर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार करा .ही विनंती .|| दत्तगुरू ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

1 comment: