Thursday, December 15, 2016

Gurupaduka Ashtak


ज्या संगतीनेंच विराग झाला।
मनोदरीचा जडभास गेला॥
साक्षात्परमात्मा मज भेटवीला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥१॥


सद्योगपंथे घरिं आणियेलें ।
अंगेच मातें परब्रह्म केलें ॥
प्रचंड तो बोधरवी उदेला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥२॥

चराचरीं व्यापकता जयाची।
अखंडभेटी मजला तयाची॥
परंपदी संगम पूर्ण झाला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥३॥

जो सर्वदा गुप्त जनांत वागे।
प्रसन्नभक्ता निजबोध सांगे ॥
सद्भक्तिभावा करितां भुकेला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥४॥

अनंत माझे अपराध कोटी।
नाणी मनीं घालूनि सर्व पोटीं ॥
प्रबोधकरितां श्रम फ़ार झाला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥५॥

कांही मला सेवनही न झालें ।
तथापि तेणे मज उद्धरीलें ॥
आता तरी अर्पिन प्राण त्याला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥६॥

माझा अहंभाव वसे शरीरीं ।
तथापि तो सद्गुरु अंगिकारी॥
नाही मनी अल्प विकार ज्यालां ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥७॥​

आतां कसा मी उपकार फ़ेडूं ।
हा देह ओवाळून दूर सांडू ॥
म्यां एकभावें प्रणिपात केला ।
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥८॥

जयां वानिता वानिता वेदवाणी ।
म्हणे नेति नेती ति लाजे दुरुनी॥
नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला

जो साधुचा अंकित जीव जाला।
त्याचा असे भार निरंजनाला ॥
नारायणाचा भ्रम दूर केला ॥
विसरुं कसा मी गुरुपादुकांला॥१०॥

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 




No comments:

Post a Comment