Wednesday, June 8, 2016

गिरनार


This information is taken from Facebook page :- ●|| वास्तु सुख ||●™

●|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||●

" गिरनार " हे दत्तमहाराजांचे अक्षय निवासस्थान आहे, या विषयी शंकाच नाही. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे.अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधनारत आहेत ते उगाच नाही. बाबा किनाराम अघोरी, वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.

" गिरनार " ही महाराजांची तपोभूमी आहे. या शिखरावर दत्तमहाराजांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली. त्यांचा पायांचे गुरूशिखरावर उमटलेले ठसे, म्हणजेच त्यांचे चरणकमल, दत्तभक्तांचे प्रेरणास्त्रोत बनले आहे. ईश्वराचे इतर अवतार हे त्या त्या कार्यापुरते मर्यादित होते, परंतु दत्तमहाराजांचा अवतार चिरंजीवी असून ते सदैव कार्यरत आहेत.ते परमगुरु असून सर्वांना आजही मार्गदर्शन करीत आहेत.

आपण केलेल्या श्रध्दायुक्त भक्तीचा मोबदला दत्तभक्तांना कित्येक पटींनी कृपाशीर्वादाच्या रूपात परत मिळतो यात शंकाच नाही. वाम मार्गाला गेलेल्या भक्ताला दंडित करून पुनःश्च सन्मार्गाला लावण्याचे काम दत्तप्रभूच करू शकतात. तुम्ही त्यांच्यावर जेवढे प्रेम कराल त्याच्या कित्येक पट प्रेम महाराज तुम्हाला देत असतात. वरून वज्रासारखे कठोर दिसणारे महाराजांचे अंतःकरण हे अंतरंगातून दयेचा सागर आहे, हे निःसीम दत्तभक्ताला कळून चुकते.

" गिरनार " चे रूप मी काय वर्णावे ?
साक्षात रैवतक पर्वतच तो.कित्येक सिद्ध महंतानी साधना करून सिद्ध केलेली पवित्र भूमी ती. विशेष म्हणजे दत्तमहाराजांनी या स्थानावर बारा हजार वर्षे तपश्चर्या केली होती.
आजुबाजूच्या परिसरात पाण्याचा दुष्काळ पडला होता. त्यावेळी अनुसूया मातेने महाराजांची तपश्चर्या भंग केली होती. तेव्हां त्यांनी आपला कमंडलु जोरात खाली फेकला. तो ज्या ठिकाणी पडला तेथे साक्षात् गंगा अवतरली. तेच ते आजचे कमंडलु कुंड. आज ही तेथे अव्याहत पाणी असते.

समोरच दातार पर्वत आहे. दत्तशिखराभोवती असलेल्या गिरीशिखरांवर अंबाजी, गोरक्ष, नवनाथ, महाकाली, अनुसूया, रेणुकामाता, भैरवदादा आणि कित्येक देवदेवता वास्तव करतात. गिरनारच्या पवित्र भूमीत शिरताच तेथील बदल जाणवतो. गिरनारचे जंगल हे वाघ सिंहाचे जंगल आहे. येथे दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिनाच आहे. प्रत्येक ऋतूमध्ये गिरनार चे वेगळेपण दिसून येते.
गिरनारच्या कित्येक अज्ञात गुहांमध्ये आजही साधूसंन्यासी ध्यानधारणा, तपस्या करीत आहेत. गिरनारच्या पायथ्याशी ऊन आणि जैनमंदिराच्या वर अंबाजी पासून पाऊस. असे चित्र पावसाळ्यात नेहमी दिसते.

" भवनाथ मंदिर "

गिरनारच्या पायथ्याशी भवनाथ मंदिर आहे.
महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मुंगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ १० ते १२ लाख लोक जमा होतात. स्वयं शिवजी या कुंडात स्नानासाठी येतात.
मुंगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. या कुंडात काही साधूसंन्यासी स्नानाला जाताना दिसतात पण बाहेर येताना दिसत नाहीत, असे तेथील लोक सांगतात.

भवनाथ मंदिराच्या बाजूलाच असलेले वस्त्रोपदेश महादेव मंदिर हे भवनाथ ( तलेटी ) मधील सर्वात प्राचीन मंदिर आहे.

" गोपीचंद आणि राजा भर्तरीमाथ "

गिरनार चढू लागले की २,३०० पायर् यां जवळ गोपीचंद आणि राजा भर्तरीनाथ या चिरंजीवी सिद्धयोग्यांची गुंफा आहे. याच गुंफेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली. राजा भर्तरीनाथ आपल्या पिंगला राणीच्या वियोगात रानोमाळ भटकत असतांना गोरक्षनाथांनी अनेक पिंगला उभ्या करुन त्याचा भ्रमनिरास केला आणि राजाला याच गुंफेमध्ये तपश्चर्येला बसविले होते.

" भगवान नेमिनाथ "

साधारण ३,८०० पायर् यांवर नेमिनाथ भगवान यांचे प्रसिद्ध जैन मंदिर आहे. हे बावीसावे तीर्थंकर होते. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची मूर्ती फार आकर्षक आहे.नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे.

" अंबाजीमाता "

४,८०० पायर् यांवर अंबाजीचे जागृत स्थान आहे. हे समुद्रसपाटी पासून. ३,३३० फूट उंचीवर आहे.
५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे.मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय रहात नाही.मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो.

" गुरू गोरक्षनाथ "

पुढील डोंगराच्या सुळक्यावर सर्वांत उंच म्हणजेच ३,६६६ फूट उंचीवर गुरू गोरक्षनाथांचे स्थान आहे. गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे.
येथे त्यांच्या चरणपादुका आणि अखंडधुनी आहे. बाजूलाच असलेल्या बोगद्यातून बाहेर पडणार् यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे.

" गुरूशिखर "

गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. त्याची उंची ३,६३० फूट असून शिखरावर निमुळत्या टोकावर महाराजांचे चरणकमल जगावर अंकुश ठेवण्याचे काम करीत आहेत. सुरूवातीच्या काळात शिखरावर चरणाजवळ मोजक्याच चार-पाच जणांना बसण्यापुरती जागा होती. आता आजुबाजूला बांधकाम करून छोटे मंदिर बांधले आहे.आतील जागा सपाट करून काही माणसांना बसण्यापुरती जागा केली आहे. बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते.
चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. मंदिर बांधण्यापूर्वी शिखरावर बसणे म्हणजे एक दिव्यच होते. वार् याच्या वेगामुळे शिखरावर उभे राहणेही शक्य होत नव्हते.
पावसाळ्याचा काळ फारच खडतर असतो. या काळात इथे दिवसभर असणाऱ्या पुजार् यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच.

साधारणपणे गुरूचे स्थान उंचीवर असते. परंतु गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की
" आपले चरण दर्शन मला सतत व्हावे ",
महाराजांनी हे मान्य केले.
यामुळे गोरक्षशिखर गुरूशिखरापेक्षा थोडे उंच आहे. या गोरक्षनाथ दत्तचरणांचे दर्शन घेतात.

" कमंडलु कुंड आश्रम "

गुरुशिखरावरुन खाली उतरले कि कमंडलु कुंड आश्रम येतो. आश्रमाजवळ कमंडलुकुंड आहे.एकदा महाराज तपश्चर्येत मग्न असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन अनुसूया मातेने पुत्राला ध्यानावस्थेतून बाहेर काढले, तेव्हा त्यांनी हातातील कमंडलु खाली फेकला तो ज्या ठिकाणी आपटला तेथून गंगा अवतरली. हा अखंड झरा आजही कमंडलु कुंडात प्रवाहित आहे.

" दत्तधुनी "

दत्तमहाराजांनी प्रज्वलित केलेली अखंड धुनी ही एक दैवदुर्लभ देणगी आहे.
दत्तधुनी दर सोमवारी धुनी उघडतात
त्यामध्ये पिंपळाची लाकडे समर्पित करतात.त्यावेळेचा चमत्कार हा अवर्णनीय असतो.अग्नी आपोआपच प्रज्वलित होतो आणि तेव्हा साक्षात अग्नी नारायणाचे अस्तित्व जाणवते. श्रध्दावान भक्तांस त्या मध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शन होते.

आश्रमामध्ये अन्नछत्रही आहे. आजही हे अन्नछत्र २४ तास उघडे असते,
" दत्तमहाराज " कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात . या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागलेल्या दत्त भाविकांना मिळतो. अशी ही गिरनार पर्वताची महती सांगावी तेव्हढी थोडीच आहे.

" महाकाली गुंफा "

आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुंफेच्या डोंगराकडे जाता येते.
ही वाट तशी घनदाट जंगलातील असून येथे पायर् या नसून खडकाळ दगडावरुन जावे लागते. बाजूलाच दिसणाऱ्या दर् या अन् ओबडधोबड रस्ता हा सर्व सामान्यांसाठी कस पाहणारा ठरतो.गुंफेमध्ये मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे. आत बेताच्या उंचीमुळे पूजा-अर्चा बसूनच करावी लागते. बाजूलाच असणाऱ्या दोन डोंगरावर " रेणुकामाता " अन् " अनुसूयामाता " विराजमान आहेत.

" दातार पर्वत आणि नवनाथ स्थान "

गिरनारच्या बाजूला नजर टाकली की भव्य दातार पर्वत दिसतो. या पर्वतावर चढताना साधारण ३,००० पायर् यावर " दातार भगवान " वसले आहेत.
त्यापुढे नवनाथांचे स्थान आहे. या पर्वतावर चढण्याचा रस्ता फारच अवघड आहे.

" जोगीणीचा डोंगर "

दातार पर्वताच्या समोरच असलेला डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगरावर जाण्यास आजही कोणी धजावत नाही. या डोंगरावरील एका गुंफेमध्ये शिवलिंग असून, ही अरूंद गुंफा आत प्रशस्त होत गेली आहे.एक वृद्ध बापू तेथे सेवा करतात. याच डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे.

" गिरनार परिक्रमा "

गिरनार परिक्रमेका अनादीकालापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे.भगवान श्री कृष्णानेही याची यथोचित महती सांगितली आहे.
श्रीकृष्णाने आपल्या राण्या, बहीण सुभद्रा आणि अर्जुन यांसमवेत गिरनार परिक्रमा केली होती. त्यावेळी त्यांनी अर्जुनाला या परिक्रमेचे महत्त्व विदीत केले होते. साधारण ५,००० वर्षापुर्वी जुनागढ वर श्रीकृष्णाचे बंधू श्रीबलराम राज्य करीत होते. आजही ही परिक्रमेची प्रथा चालू आहे.
भिमाने हिडींबेशी विवाह याच परिसरात केला होता.

कार्तिक शुध्द एकादशी पासून गिरनार परिक्रमेला सुरूवात केली जाते. भवनाथ ( तलेटी ) येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून सुरूवात करतात.

१ दिवस

पहिला पडाव जीनाबाबांच्या मढी जवळ करतात. येथे चंद्रमौलेश्वराचे मंदिर आहे.

२ दिवस

दुसर् या दिवशी मालवेला मंदिर लागते.

३ दिवस

पुढील मुक्कामी खिंडीतून प्रवास करून बोरदेवी गाठतात. खिंडीच्या माथ्यावर तपासणी नाके उभारून यात्रेकरुंची तपासणी केली जाते.

४ दिवस

चौथ्या दिवशी बोरदेवी ते भवनाथ असा परतीचा. प्रवास सुरू असतो.

कार्तिक पौर्णिमेला परिक्रमेची समाप्ती होते. संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो. या परिसरात वाघ सिंहाचा वावर जास्त असतो. या परिक्रमेच्या काळात वाघ, सिंह तर सोडाच, परंतु साप, विंचू यांचेही भय नसते. ही महाराजांची किमया आहे . महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरु निर्भय होऊन परिक्रमा करतात.

" गिरनारची महती "

शिवपुराणात गिरनार चा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे.स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात.
रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती ( ब्रह्मा,विष्णू, शंकर ) यांच्याशी निगडीत आहेत.

रामंचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर असल्याचे दाखले पुराणांत मिळतात.गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो.
वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. तेजोमय दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे.

गिरनारच्या ९,९९९ पायर् या.
माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते. शेवटच्या पायरीवर " त्यागाचाही त्याग. करायचा आहे ".

" काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत. जोपासल्या गेल्या आहेत.त्या समूळ नाहीशा होतील तेव्हाच दत्त भेटतील.

This information is taken from Facebook page :- ●|| वास्तु सुख ||●™







No comments:

Post a Comment