Monday, January 11, 2016

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

** श्रीमन्नृसिंह सरस्वती द्वितीय अवतार **

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती !! भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते, तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्रीनरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.

भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.

भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहून कृष्णामाईच्या तीरावरील औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास राहिले. तेथे " विमल पादुका " स्थापून पुढे नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या " मनोहर पादुका " स्थापन केल्या व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात " निर्गुण पादुका " स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.

भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चार वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. अशा जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा मूर्खपणाच नव्हे काय?
भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे.

लेखक - रोहन विजय उपळेकर



श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अष्टक स्तोत्र

इंदु कोटि तेजकीर्ण सिंधुभक्त वत्सलं।
नंदनासुनंदनेंदु इंदिराक्ष श्री गुरुम्।
गंध माल्य अक्षतादि वृंद देव वंदितं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥१॥

माया पाश अंध:कार छायादूर भास्करं।
आयताक्षी पाहि श्रीयावल्ल्भेश नायकं।
सेव्य भक्ती वृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥२॥

चित्तजादि वर्गषटक मत्तवारणां कुशं।
तत्वसार शोभीतात्म दत्त श्री वल्लभं।
उत्तमावतार भूत कर्तू भक्त श्री वत्सलं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥३॥

व्योम रवी वायु तेज भूमी कर्तुमीश्वरं।
काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनं।
कामितार्थ दांतभक्त कामधेनू श्री गुरुं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥४॥

पुंडरीक आयताक्ष कुंड्लेंदु तेजसं।
चंडदुरीत खंडनार्थ दंडधारी श्री गुरुं।
मंडलीक मौलीमार्तंड भासिता नं नं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।५॥

वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ती श्री गुरुं।
नादकलातीत कल्प पाद पाय सेव्ययं।
सेव्य भक्ती वृंदवरद भूयो भूयो नमाम्य हं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।६॥

अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान नवारिधीं।
कृष्णा वेणीतीर वास पंच नद्य संगमं।
कष्ट दैन्य दूर भक्त तुष्ट काम्य दायकं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।७॥

नारसिंह सरस्वतीश नाम अष्ट मौक्तिकं।
हार कृत्य शारदेन गंगाधराख्या स्यात्मजं।
वारुणीक देवदिक्ष गुरुमुर्ती तोषितं।
परमात्मा नंदश्रीया पुत्रपौत्र दायकं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।८॥

नारसिंह सरस्वतीश अष्टकंच य: पठेत।
घोर संसार सिंधु तारण्याख्य साधनं।
सारज्ञान दीर्घ मायुरारोग्यादि संपदाम।
चातुर्वर्गकाम्य लोका वारंवार य: पठेत।

वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।९॥






No comments:

Post a Comment