Friday, February 17, 2017

टेंब्ये स्वामी महाराजानी रचलेल्या स्तोत्रांचे फलित

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजानी रचलेल्या स्तोत्रांचे फलित –

१. घोरकष्टोध्दरण स्तोत्र - आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.

२. श्रीदत्तमाला मंत्र - रोज मनोभावे कमीत कमी १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते.

३. श्री दत्तात्रेय कवच - सर्व शारीरिक संरक्षण.

४. श्री दत्तस्तोत्र - राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणे.

५. श्रीपादवल्लभस्तोत्र - देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी.

६. अपराधक्षमापनस्तुति - नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.

७. श्री दत्तभावसुधारसस्तोत्र - पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते.

(मंत्र क्रं ६३ भगवदभक्त संतान होण्यासाठी व मंत्र क्रं ६६ पोटदुखी कमी होण्यासाठी असे सांगितले आहे.)

८. श्री सप्तशतीगुरुचरित्र - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

९. श्री दत्तलीलामृताब्धिसार - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

१०. श्री दत्तमाहात्म्य - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

११. वासुदेवमननसार - प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.

१२. सार्थ बालाशिषस्तोत्र - कुमाराना क कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून
मुक्त करणारे.
१३. मंत्रात्मक श्लोक - जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र..

१४. चाक्षुषोपनिषद - डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी.

१५. मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं । वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम ।।
अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त

Saturday, February 4, 2017

१८ पुराणांची थोडक्यात माहिती

अठरा पुराणांची नांवे-

मत्स्यपुराण, वायुपुराण, भागवतपुराण, विष्णूपुराण, गरुडपुराण, ब्रह्मपुराण, नारदपुराण, वामनपुराण, कुर्मपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण, मार्कंडयपुराण, शिवपुराण, अग्नीपुराण, वराहपुराण, ब्रम्हांडपुराण, ब्रह्मावैवस्वतपुराण आणि भविष्यपुराण

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

१८ पुराणांची थोडक्यात माहिती......

१. मत्स्यपुराण : भगवान विष्णूने मत्स्यरूपाने मनूला सांगितलेले हे पुराण इ.स.च्या दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे आणि त्याचा मूळचा भाग इ.स.पू ६००ते ३०० च्या दरम्यानचा असावा, असे म्हणतात. दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, नासिक वा नर्मदातीर या ठिकाणी ते लिहिले गेले असावे, अशी मते आढळतात. याचे २९१ अध्याय असून श्लोक सु. १४-१५ हजार आहेत. स्वल्पमत्स्यपुराण या नावाने याचे एक संक्षिप्त स्वरूपही आढळते. यात फार कमी प्रमाणात भर पडलेली असून यातील राजवंशाची हकिकत विश्वसनीय आहे. याच्या ५३ व्या अध्यायात सर्व पुराणांची विषयानुक्रमणी आलेली आहे. यात वितृवंश, ऋषिवंश, राजवंश, राजधर्म, हिमालय, तीर्थे इ. विषयांचे वर्णन प्रामुख्याने आलेले आहे.

२. वायूपुराण : वायूने सांगितल्यामुळे वायुपुराण म्हटले जाणारे हे पुराण सर्वात जुने आहे, असे डॉ. भांडारकरांचे मत असून काहीजणांनी त्याचा काळ सु.इ.स.३०० हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोदघात, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणात ११२ अध्याय असून त्याची श्लोकसंख्या सू.११ हजार आहे. यात पंचलक्षणे स्पष्टपणे आढळत असून पाशुपतयोग, गयातीर्थ इत्यादींचीही वर्णने आढळतात. यात शिवचरित्राचे विस्तृत वर्णन असून भौगोलिक वर्णनांसाठीही हे पुराण प्रसिद्ध आहे.

३. भागवतपुराण : भागवतधर्माचे विवेचन करणारे आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हे पुराण अत्यंत लोकप्रिय आहे. ते व्यासांनी आपला पुत्र शुक याला सांगितले, असे म्हटले जाते. परंतु बोपदेव नावाच्या पंडिताने ते लिहिले, असेही एक मत आहे. त्याचा काळ इ.स.पू. तिसरे शतक, इ.स.चे पाचवे ते दहावे शतक, असा वेगवेगळा सांगितला जातो. हे पुराण दक्षिणेत तमिळनाडूमध्ये लिहिले गेले, असे मत आढळते. १२ स्कंधांत विभागलेल्या या पुराणात सु. १८ हजार श्लोक आहेत. हे पुराण दहा लक्षणांनी युक्त असून कृष्ण हा नायक आहे. भक्ती,तत्त्वज्ञान इ. दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. त्याचे भ्रमरगीत, रासपंचाध्यायी इ ,भाग प्रसिद्ध आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा त्यावर जास्त टीका झाल्या असून त्याची प्रादेशिक भाषांत व इंग्रजीतही भाषांतरे झाली आहेत. चातुर्मास्यात भागवतसप्ताह करण्याची पद्धत सर्व भारतात आहे.

४. विष्णूपुराण : विष्णूभक्तिला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचे नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवतपुराणाखालोखाल महत्त्वाचे असून वैष्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्त्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले, असे म्हटले आहे. इ.स.च्या ३ ते ५ या शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. बलदेव उपाध्यांच्या मते इ.स.पू. दुसरे शतक हा त्याचा काळ होय. हे पुराण सहा अंशांत विभागलेले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीत सु. सहा-सात हजार श्लोक आहेत. या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुराणाइतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुराणात आढळत नाही.यात अनेक आख्यानांबरोबरच कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे. विल्सनने या पुराणाचे इंग्रजीत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे.

५. गरुडपुराण : विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने या पुराणाद्वारे वैष्णव तत्त्वांचे वर्णन केले, म्हणून याला गरुडाचे नाव प्राप्त झाले. हे इ.स.च्या सातव्या चे दहाव्या शतकांत तयार झाले असावे, असे दिसते. डॉ हाझरा यांच्या मते हे मिथिलेत लिहिले गेले. याचे अध्याय २६४ असून श्लोक सु. ७ हजार आहेत. याच्या पूर्वखंडात व्याकरण, छंद साहित्य, वैद्यक इ. विषयांची माहिती असल्यामुळे हे विश्वकोशात्मक बनले आहे. याच्या उत्तरखंडाच्या 'प्रेतकल्पा' त और्ध्वदेहिराची माहिती आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर दहा दिवसपर्यंत घरी गरुडपुराणाचा पाठ करण्याची प्रथा आहे. याच्या उत्तरखंडाचे जर्मन भाषांतर झाले आहे.

६. ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे ब्रह्मपुराण म्हटले जाणारे हे पुराण पुराणांच्या यादीत पहिले असल्यामुळे त्याला 'आदिपुराण' म्हटले जाते. त्यात सूर्योपासना वर्णिलेली असल्यामुळे त्याला सौरपुराण असेही म्हणतात. आदिपुराण आणि सौरपुराण या नावांच्या उपपुराणांहून मात्र ते वेगळे आहे. आदिब्रह्यपुराण या नावाचे दुसरे एक पुराण असून ही दोन्ही पुराणे एकच असावीत, असे एक मत आहे. हे पुराण इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकांपुर्वी बनले असावे आणि दहाव्या, बाराव्या व पंधराव्या शतकांत त्यात भर पडली असावी; त्याचा काही भाग ओरिसात, तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा इ. मते आढळतात.या पुराणात २४५ अध्याय असून सु. १४ हजार श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र, सांख्यतत्त्वज्ञान, वैदिक ग्रंथांतील उपाख्याने इ. महत्त्वाचे विषय आले आहेत. दंडकारण्यातील गौतमी नदी व तेथील तीर्थांचे माहात्म्य १०६ अध्यायांत आले आहे.

७. नारद पुराण : या पुराणाच्या स्वरूपाविषयी बरीच अनिश्चितता दिसते. नारदीय पुराण, नारदपुराण आणि बृहन्नारदीयपुराण अशी समान नावांची तीन पुराणे आढळतात. यांपैकी महापुराण कोणते, यांविषयी संदिग्धाच आहे. यात नारदाने विष्णूभक्तीचे वर्णन केले, म्हणून हे नारदीय पुराण होय. इ.स.७०० ते १००० या काळात ते तयार झाले, अशी मते आढळतात. याचे दोन भाग असून पूर्वभागात १२५ आणि उत्तरभागात ८२ अध्याय आहेत. यातील श्लोकसंख्या बलदेव उपाध्यायांच्या मते २५ हजार तर पां.वा. काणे यांच्या मते ५,५१३ इतकी आहे. याच्या ९२ ते १०९ या अध्यायांत १८ पुराणांची विस्तृत विषयानुक्रमणी आलेली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हे पुराण महत्त्वाचे आहे. यात अनेक विषय आलेले असल्यामुळे त्याचे स्वरूप बरेचसे विश्वकोशात्मक झाले आहे.

८. वामनपुराण : यात वामनावताराचे वर्णन विशेषत्वाने असून पहिल्या श्लोकात वामनालाच नमस्कार केलेला आहे. हे पुराण पुलस्त्य ऋषीने नारदाला सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या वा सहाव्या ते नवव्या शतकांत हे पुराण तयार झाले असावे, अशी मते आढळतात. याची निर्मिती कुरुक्षेत्राला परिसरात झाली असावी, असे दिसते. याच्या उपलब्ध प्रतींत ९५ अध्याय व सु. ६ हजार श्लोक आहेत.याचा उत्तर भाग लुप्त झाला आहे. यात शैव, कालदमन, पाशुपत व कापालिक अशा चार शैव संप्रदायाचे वर्णन असून वैष्णव व पाशूपत शैव या दोहोंना समान महत्त्व दिलेले आहे. यात असुरांच्या कथा असून शिवपार्वतीचे विस्तृत चरित्र आलेले आहे. कालिदासाचे कुमारसंभव व वामनपुराण यांत वरेच साम्य आढळते.

९. कूर्मपुराण : विष्णूने कूर्मावतारात इन्द्रद्युम्न राजाला हे पुराण सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या दुसऱ्याक, पाचव्या वा सहाव्या-सातव्या शतकांत ते तयार झाले असावे, अशी मते आहेत. याचे पूर्वार्ध (५३ अध्याय) व उत्तरार्ध(४६ अध्याय) असे दोन भाग असून उपलब्ध ग्रंथात सु.६ हजार श्लोक आहेत. नारदसूचीप्रमाणे याच्या ब्राह्मी, भागवती, सौरी व वैष्णवी अशा चार संहिता होत्या; परंतु सध्या फक्त ब्राह्मी संहिताच उपलब्ध आहे. याचे नाव वैष्णव असले, तरी हे शैवपुराण असल्यामुळे शिव व दुर्गा याचे माहात्म्य हेच याचे मुख्य विषय आहेत. यात पाखंड मते दिलेली असून वाममार्गीयांच्या यामलयंत्र या ग्रंथाची माहितीही दिलेली आहे. याच पुराणात 'ईश्वरगीता' व 'व्यासगीता' अशा दोन गीता आलेल्या आहेत. तेनकाशीच्या एका राजाने सोळाव्या शतकात या पुराणाचे तमिळमध्ये भाषांतर केलेले आहे.

१०.पद्मपुराण : या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णवपुराणांत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ह्या पुराणाचा बराचसा भाग इ.स.च्या पाचव्या शतकानंतर बनलेला असला, तरी त्याचा काही भाग त्याही आधीचा आहे; आणि त्याचा उत्तरखंड मात्र सोळाव्या शतकानंतरच्या असावा, असे मत आढळते. बंगाली व देवनागरी अशा दोन प्रतींत आढळणारे हे पुराण सु ५५ हजार श्लोकांचे असून श्लोकसंख्येच्या बाबतीत ते स्कंदपुराणाखालोखाल आहे. ते सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताल व उत्तर अशा पाच खंडात विभागलेले असून त्याचे ६२८ अध्याय आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्मा, पाताल, सृष्टी व उत्तर असे सहा खंड मानले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा व तीर्थमाहात्म्ये हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत.उत्तरखंडाला जोडलेले 'क्रियायोगसार' हे परिशिष्ट वैष्णवधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कालिदासाचे शांकुंतल हे नाटक या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावर आधारलेले आहे, असे मानले जाते. पद्मपुराण या नावाची दोन जैन पुराणेही आढळतात.

११. स्कंदपुराण : स्कंदाने सांगितल्यामुळे त्याचे नाव मिळालेले हे पुराण इ.स.च्या सातव्या व नवव्या शतकांच्या दरम्यानचे असावे, असे म्हटले जाते.सर्व पुराणांत आकाराने मोठे असलेले हे पुराण ८१ हजार श्लोकांचे आहे. ते सनत्कुमार, सुत, शंकर, वैष्णव, ब्राह्मव सौर अशा सहा संहितांमध्ये विभागलेले असून माहेश्वर, वैष्णव, ब्राह्म, काशी, रेवा, तापी व प्रभास या सात खंडांतील दुसरीही एक विभागणी आढळते.याच्या सूतसंहितेत ब्रह्मगीता व सूतगीता आहेत, तर रेवाखंडांत सत्यनारायणव्रताची कथा आहे.

१२. मार्कंडेयपुराण : मार्कंडेय ऋषींनी सांगितल्यामुळे त्यांचे नाव प्राप्त झालेले हे पुराण अत्यंत प्राचीन असून त्याचा प्राचीन भाग इ. स. तिसऱ्या शतकाच्याही आधीचा असावा, असे म्हणतात. बलदेव उपाध्यायांच्या मते गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविण्यारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकांत झाले असावे. ते गोदावरीच्या उगमप्रदेशांत लिहिले गेले असावे, असे मत आढळते.यात सामान्यतः पंचलक्षणे आढळत असून केवळ १३७ अध्यायांच्या या पुराणात सु. ६,९०० श्लोक आहेत. यात द्रौपदीचे पंचपतित्व, तिच्या अल्पवयीन मुलांची हत्या इ. प्रश्नांची चर्चा असून हरिचंद्र ब्रह्यवादिनी मदालसा, कृष्ण, मार्कंडेय इत्यादींच्या कथा आहेत. अग्नि,सूर्य, देवी इत्यादींची स्तोत्रे असून 'दुर्गासप्तशती' या नावाने विख्यात असलेले देवीमाहात्म्य १३ अध्यायांत वर्णिलेले आहे. पार्जिटरने याचे इंग्रजी भाषांतर केलेले असून प्रारंभीच्या काही अध्यायांचे जर्मन भाषेतही भाषांतर झाले आहे.

१३. लिंगपुराण : शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून या पुराणाद्वारे मोक्षादींचे विवेचन केले, या समजुतीमुळे याला लिंगपुराण हे नाव मिळाले आहे. याचा काळ सु, सातवे-आठवे शतक असण्याची शक्यता आहे. याचे पूर्वार्ध व उत्तरार्धा असे दोन भाग असून, पूर्वार्धाचे १०८ व उत्तरार्धाचे ५५ अध्याय आहेत. त्यांपैकी उत्तरार्धाचे काही अध्याय गद्य आहेत. याची श्लोकसंख्या सु. अकरा हजार असून सु. सहा हजार श्लोकांचे आणखी एक छोटे लिंगपुराण होते, असे दिसते. यात ब्रह्मांडरुपी लिंगाची उत्पती, लिंगपूजा, शैवव्रते,शिवाचे २८ अवतार, काशीचे वर्णन ,तंत्रविद्या इ.विषय प्रामुख्याने आले असून हा लिंगायतांचा एक प्रमुख धर्मग्रंथ मानला जातो.

१४. अग्निपुराण : अग्नीने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नीचे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे, असे म्हणतात. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगालात आढळत असल्यामुळे ते तेथेच तयार झाले असावे, असे एक मत आहे. ३८३ अध्यायांच्या या पुराणात पंचलक्षणे आढळत असली, तरी परा व अपरा विद्यांचे वर्णनच महत्त्वाचे आहे. रामायण व महाभारताचे सार, बुद्धावतारासह इतर अवतार इ.विषयांबरोबरच छंद, व्याकरण, अलंकार, योग, ज्योतिष मंदिरे, मूर्ती, धर्म इत्यादींची शास्त्रे यात वर्णिलेली आहेत. यात गीतासार व यमगीता आलेली असून आयुर्वेद, वृक्ष आणि पशूंचे वैद्यक, रत्नपरीक्षा, धनुर्विद्या, मोहिनी व इतर काही इ. विषयांचे विवेचन आलेले आहेत.

१५. वराहपुराण : वराहावतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत असून, ते नवव्या-दहाव्या शतकांत तयार झाले असावे आणि त्याचा काही भाग अकराव्या व काही भाग पंधराव्या शतकातील असावा, असे मत आढळते. याचा पहिला भाग उत्तर भारतात व शेवटचा नेपाळात लिहिला गेला असावा, असा तर्क आढळतो. याचे गौडीय व दक्षिणात्य असे दोन पाठभेद आढळतात. याचे २१८ अध्याय असून त्यांपैकी काही गद्यात्मक आहेत, तर काहींमध्ये गद्य व पद्य यांचे मिश्रण आहे. यात २४ हजार श्लोक असल्याचा उल्लेख आढळत असला, तरी प्रत्यक्षात मात्र सु. १० हजार श्लोकच आढळतात. व्दादशीच्या व्रतासारखी अनेक वैष्णव व्रते यात असून रामानुज संप्रदायाने यातून अनेक वैष्णव अनेक विषय स्वीकारले आहेत. यात मथुरामाहात्म्य, नचिकेत्याने उपाख्यान इ. विषय प्रामुख्याने आले आहेत.

१६. ब्रह्मांडपुराण : ब्रह्मांडाची उत्पती आणि विस्तार यांचे वर्णन हा याचा मुख्य विषय असल्यामुळे याला ब्रह्मांड हे नाव मिळाले आहे. हे वायूने व्यासांना सांगितले असल्यामुळे याला वायवीय ब्रह्मांडपुराण असेही म्हणतात. वायु व ब्रह्मांड ही पुराणे एकच असून वायुपुराणात थोडा फरक करून ब्रह्मांडपुराण बनविलेले आहे. त्यातील परशुरामचरित्राचा भाग हा वायुपुराणापेक्षा अधिक आहे. इ.स.च्या चौथ्या ,पाचव्या ला सहाव्या शतकात हे तयार झाले असावे, अशी मते आहेत. गोदावरीच्या उगमाचा प्रदेश वा सह्याद्री हे याचे निर्मितिस्थान असावे, असे दिसते. याचे प्रक्रिया, अनुषंग, उपोदघात व उपसंहार असे चार पाद असून श्लोक सु. १२ हजार आहेत. यात परशुराम व कार्तवीर्य यांचा संघर्ष. ललितादेवीचे आख्यान, क्षत्रियराजवंशाचे वर्णन इ. विषय प्रमुख आहेत. अध्यात्मरामायण हा ग्रंथ आणि ललितासहस्त्रनाम, सरस्वतीस्तोत्र, गणेशकवच इ. भाग या पुराणातून घेतलेले आहेत. जावा-सुमात्रा बेटांतील भाषेत त्याचे भाषांतर झाले असून ते अजूनही तेथे प्रचारात आहे.

१७. ब्रह्मवैवर्तपुराण : कृष्णाने ब्रह्याचे विवरण केल्याचे वर्णन यात असल्यामुळे याला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. याला दक्षिणेत ब्रह्मकैवर्तपुराण असे म्हणतात.आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक प्राचीन पुराणही आढळते. आठवे, नववे वा दहावे शतक हा त्याचा काळ मानलेला असून काहींच्या मते ते पंधराव्या शतकानंतरचे आहे. बहुधा बंगालमध्ये लिहिल्या गेलेल्या या पुराणाविषयी बंगाली वैष्णवांना फार आदर आहे. याचे २७६ अध्याय असून श्लोक सु. १८ हजार( एका मतानुसार सु.१० हजार) . ब्रह्म, प्रकृती, गणेश व कृष्णजन्म अशा चार खंडांत विभागलेल्या या पुराणाचा कृष्णजन्म खंड १३३ अध्यायांचा आहे. यात गणेश हा कृष्णाचा अवतार मानलेला असून उत्तान रासक्रिडा, अनेक माहात्म्ये इ. गोष्टी आढळतात.

१८. भविष्यपुराण : वस्तुतः पुराण हे प्राचीन असल्यामुळे भविष्यपुराण या नावात आत्मविसंगती आहे. परंतु भविष्यकालीन घटनांची व व्यक्तिंची वर्णने करण्याची भूमिका घेतल्यामुळे याला भविष्यपुराण हे नाव मिळाले आहे. भविष्योत्तर पुराण या नावाचे एक स्वतंत्र पुस्तक असून काहींच्या मते ते भविष्यपुराणाचे उत्तर पर्व आहे. काहीच्या मते ते स्वतंत्र पुराण आहे. याचा काळ सु. सहावे-सातवे वा दहावे शतक हा मानला जात असला, तरी आपस्तंबधर्मसूत्रात त्याच्या नावनिशी उल्लेख असल्यामुळे त्याचा निदान काही भाग तरी अत्यंत प्राचीन असला पाहिजे. नारदपुराणानुसार याची ब्राह्म, विष्णू, शिव, सूर्य व प्रतिसर्ग अशी पाच पर्वे असून श्लोकसंख्या सु. १४ हजार आहे. याच्या वेगवेगळ्या चार प्रती मिळालेल्या आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा यात जास्त भर पडली असल्यामुळे याचे मूळचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. यात इंग्रजी अमदानीतील घटनांचीही वर्णने आली आहेत. उदा, व्हिक्टोरिया राणीला यात विकटावती म्हटले आहे, तर रविवारला संडे म्हणतात, असे सांगितले आहे. यात सूर्योपासना विशेषत्वाने आली असून कित्येक घटनांची व राजवंशांची वर्णने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहेत.

॥श्री गुरुदेव दत्त॥


this information is taken from TEMBE SWAMI GROUP written by 
हेमाली कोठावळे